(रत्नागिरी)
मिरजोळे गावातील ग्रामस्थांनी वाढीव वीजबिल व जबरदस्तीने बसवण्यात आलेल्या स्मार्ट वीजमीटर विरोधात आज (११ सप्टेंबर २०२५) कुवारबाव येथील एमएसईबी कार्यालयावर मोर्चा काढला.
काही महिन्यांपूर्वी गावातील प्रत्येक घरातील जुने व्यवस्थित चालू असलेले मीटर कोणालाही न विचारता, नोटीस न देता कॉन्ट्रॅक्टरमार्फत बदलण्यात आले. यावेळी काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता, मात्र धमकी देत मीटर बदलण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांना वाढीव बिल येऊ लागल्याने ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली. ग्रामपंचायतीमार्फत एमएसईबी अधिकाऱ्यांना तक्रार पत्र देऊन वाढीव बिलांबाबत उपाययोजना करावी आणि जुने मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी करण्यात आली.
तथापि, अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आज ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी अधिकारी उपस्थित असूनही ग्रामस्थांच्या शंका समाधानकारकपणे दूर केल्या नाहीत.
मोर्चादरम्यान वैभव पाटील, तसेच सरपंच रत्नदीप पाटील, गजानन गुरव, शुभानंद पाटील, राहुल पवार, संदेश वाडकर, रजनीकांत पंडये, किशोर जोशी, राजा मयेकर, सुनील कळंबटे, दत्ताराम गुरव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी यावेळी जाहीर इशारा दिला आहे की, स्मार्ट मीटर बदलल्या शिवाय आम्ही कोणीही वीजबिल भरणार नाही.

