(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीतील ओला शोरूम अनेक महिन्यांच्या बंदोबस्तानंतर बुधवारी अचानक सुरु होताच ग्राहकांचा प्रचंड रोष उसळला. महिनोनमहिने थांबलेल्या सेवेसाठी संतप्त ग्राहकांनी थेट शोरूममध्ये धडक मारत कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
या गोंधळात काहींनी गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला, तर एका आक्रमक ग्राहकाने पेट्रोल टाकून शोरूम पेटवून देण्याची धमकी दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. मात्र शेवटी ग्राहकांना समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. काही महिन्यांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने परवाना नसल्याने हे शोरूम बंद केले होते. मात्र या काळात शेकडो ग्राहकांना विक्री झालेल्या ओला दुचाक्यांच्या सेवेसाठी कोठेच दार उघडे नव्हते. ‘फ्री सर्व्हिसिंग’चे आश्वासन देऊन घेतलेल्या गाड्या दुरुस्तीअभावी अक्षरशः पडून राहिल्या. इतर मेकॅनिकदेखील या गाड्यांना हात लावत नसल्याने ग्राहकांचा संताप दिवसेंदिवस वाढत गेला.
लाखो रुपये मोजून घेतलेल्या गाड्यांची दुरुस्ती कोल्हापूरपर्यंत खेचून न्यावी लागणार, असा पेच ग्राहकांसमोर निर्माण झाला. त्यातच शोरूम बंद करताना किंवा पुन्हा सुरु करताना कंपनीकडून कोणताही अधिकृत संवाद न झाल्याने ग्राहकांची घडी विस्कटली. या निष्काळजीपणाचाच उद्रेक बुधवारी पाहायला मिळाला.

