(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावर आज (गुरुवार, ११ सप्टेंबर) रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मौजे भोगाव पुलावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली इको कार संरक्षक भिंतीवर आदळून उलटली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे किरकोळ जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, लिंगप्पा कट्टप्पा पातारे (वय २९, रा. आदर्शनगर कॉलनी नं. २, दिघी, पुणे) हा आपल्या ताब्यातील इको कार (एमएच-१४ केएस-०२३१) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाला होता. मात्र, मौजे भोगाव पुलावर पोहोचताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डाव्या बाजूच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. त्यामुळे गाडी उलटली.
या अपघातात अनिल देविदास कांबळे (वय ५५, रा. घरवली, ता. हवेली, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक लिंगप्पा पातारे, नागेश मलके कांबळे (वय ३७, रा. चरवली, ता. हवेली, जि. पुणे) आणि विकास शंकर चव्हाण (वय १८, रा. चरवली, ता. हवेली, जि. पुणे) हे तिघे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस विभाग, कशेडी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मृतदेह व जखमींना रुग्णवाहीकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

