(रत्नागिरी)
तालुक्यातील सोमेश्वर येथे वास्तव्यास असलेल्या मकरंद यशवंत जाधव (वय ४८, मूळ राहणार करबुडे) यांचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जाधव यांना पूर्वी पक्षाघाताचा (पॅरालिसिस) त्रास झाला होता. मात्र, ते पूर्णपणे बरे झाले होते. २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी त्यांना अचानक ताप व अंगदुखीचा त्रास जाणवला. त्यामुळे त्यांनी सोमेश्वर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर ते घरी परतून जेवण करून झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे २९ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता त्यांचे मित्र निखिल पवार त्यांना उठवण्यासाठी गेले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यावेळी त्यांच्या तोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले. तातडीने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या अचानक झालेल्या निधनाने करबुडे आणि सोमेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.

