(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राजापूर अर्बन बँकेतील प्रचंड कर्ज घोटाळ्यामुळे शेकडो खातेदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वतः कोणतेही कर्ज न घेतल्यावरही लाखो रुपयांच्या कर्जफेडीच्या नोटिसा मिळाल्याने खातेदार अक्षरशः संतापाने पेटून उठले आहेत. या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तालुका सहायक निबंधक कार्यालयात झालेल्या सुनावणीदरम्यान जोरदार गोंधळ उडाला.
सुमारे ३५ खातेदार या सुनावणीसाठी हजर झाले होते. यावेळी अधिकारी आणि खातेदारांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. खातेदारांच्या नावे त्यांच्या नकळत लाखो, अगदी कोट्यवधी रुपयांची कर्जे मंजूर झाल्याचे उघड झाल्याने उपस्थित सर्वच खातेदार हवालदिल झाले. एका खातेदाराच्या नावावर तब्बल ८० लाखांचे कर्ज असल्याचे ऐकून संतापाचे वातावरण अधिकच पेटले. या प्रकरणात सुमारे ३ कोटी रुपयांचे थकीत कर्ज असल्याचे समोर आले असून, त्यासाठी खातेदारांनाच जबाबदार धरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे संतप्त ग्राहकांनी थेट बँकेच्या संचालकांना किंवा अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याची मागणी केली. केवळ वकिलाला पाठवून बँक जबाबदारी झटकत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यापूर्वीही या घोटाळ्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद झाली होती आणि एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अधिकाऱ्याला निलंबित केले असले तरी, नाहक कर्जफेडीच्या नोटिसा आल्याने निष्पाप खातेदारांची मोठीच कोंडी झाली आहे. नोटिसा मिळालेल्या सर्वांनी बुधवारी एकत्र येऊन कार्यालयात आक्रमक पवित्रा घेतला. अधिकाऱ्यांसमवेत सायंकाळपर्यंत खातेदारांची सुनावणी सुरूच होती.
कर्ज घोटाळा हा फक्त आर्थिक गैरव्यवहार नाही; तर….
राजापूर अर्बन बँकेतील कर्ज घोटाळा हा फक्त आर्थिक गैरव्यवहार नाही; तर तो सहकारी बँकिंग व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा आणि देखरेखीतील निष्क्रियतेचा ठळक नमुना आहे. ज्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे बचत करून बँकेच्या तिजोरीत ठेव केली, त्यांनाच न घेतलेल्या कोट्यवधींच्या कर्जाची नोटिसा बजावणे, ही सामान्य माणसाच्या विश्वासघाताची पराकाष्ठा आहे. या सर्व प्रकाराने काही महत्त्वाचे व गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बँकेतील या प्रचंड कर्ज घोटाळ्याला जबाबदार कोण? निष्पाप खातेदारांवर नोटिसा बजावण्यामागचे कारण काय?, बनावट कर्ज प्रकरणात खरे चेहरे कधी उघडकीस येणार?, बँकेचे संचालक आणि जबाबदार अधिकारी अद्याप मौन का बाळगत आहेत? आणि माथी मारलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

