(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुका गुणवत्ता कक्षाची सभा गटविकास अधिकारी चेतन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या दृष्टीने या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागातील अधिकारी, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शिक्षक प्रतिनिधींनी समन्वयाने शालेय शिक्षण अधिक प्रभावी करण्याबाबत आपले विचार मांडले.
या सभेत तालुका गुणवत्ता कक्षाची उद्दिष्टे, मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी, शालेय उपक्रमांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी देणे, शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि निष्ठा FLN ऑनलाइन प्रशिक्षण यांसह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच वीर गाथा ६.० उपक्रम, शैक्षणिक ग्रामसभांचे आयोजन व प्रभावी अंमलबजावणी, त्रैमासिक शैक्षणिक पालक सभा, शैक्षणिक प्रक्रियांचा आढावा, शिक्षण परिषद, शाळा व्यवस्थापन समिती (SMC) आणि समूह साधन केंद्र (CRG) यांच्या बैठकांचे नियोजन यावरही चर्चा झाली.
याशिवाय मूल्यवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी, शाळापूर्व तयारी अभियान, विद्या प्रवेश कार्यक्रम आणि रूम टू रीड या उपक्रमांबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सभेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि समन्वयावर भर देण्यात आला.
या वेळी ग्यान प्रकाशनाचे राहुल मिसाळ, मासिक पाळी व्यवस्थापन विभागाच्या प्रशिक्षिका मनिषा गवाणकर, पंचायत समिती शिक्षण विभागाच्या साधन व्यक्ती संगिता पवार, रूम टू रीड विभागाचे सागर उबाळे आणि शिक्षण विस्तार अधिकारी एस. जे. मुरकुटे यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तालुका गुणवत्ता कक्षाच्या पहिल्याच सभेत त्यांनी संबंधित उपक्रमांची उद्दिष्टे आणि अंमलबजावणीविषयी आपले विचार मांडले.
गटविकास अधिकारी चेतन शेळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राथमिक व माध्यमिक शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी आणि इंग्रजी भाषा उत्तम प्रकारे वाचता आली पाहिजे. तसेच वर्गात उभे राहून इंग्रजीत आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिता आले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांनी अधिक मेहनत घेऊन आत्मीयतेने कार्य करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
या सभेला रत्नागिरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल, शिक्षण विस्तार अधिकारी एस. जे. मुरकुटे, भाग्यश्री हिरवे, सशाली मोहिते, सरोज आखाडे, सविता तोटावर, विषय साधन व्यक्ती संगिता पवार, केंद्रप्रमुख संतोष मोहिते व विष्णू पवार, मनिषा गवाणकर, सागर उबाळे, मुख्याध्यापक सुभाष पाटील व श्रीशैल्य पुजारी, शिक्षक प्रतिनिधी संतोष गार्डी व संतोष पवार, विशेष शिक्षक अश्विनी मयेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर कळंबटे आणि समिर जाधव यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक तज्ज्ञ उपस्थित होते.


