(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या यशस्वी परंपरेत आणखी एका मानाच्या यशाची भर घातली. हिंदी एकपात्री अभिनय स्पर्धेत महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष Performing Arts शाखेतील विद्यार्थिनी हिमांशी चौहान हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत महाविद्यालयाने प्रथमच यश संपादन केले असून, तिच्या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या युवा महोत्सवात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सुमारे ३७३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. विविध सांस्कृतिक स्पर्धांनी रंगलेल्या या महोत्सवात हिमांशी हिने ‘साठा प्रथा’ या विषयावर प्रभावी एकपात्री सादरीकरण केले. तिच्या अभिनयाची विद्यापीठ स्तरावर दखल घेण्यात आली. विशेष म्हणजे, या एकपात्रीचे लेखनही तिने स्वतः केले असून, यातून तिच्या अभिनयकौशल्यासह सर्जनशील लेखनक्षमतेचेही दर्शन घडले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत उल्लेखनीय कामगिरी करत असते. यंदा हिंदी एकपात्री अभिनय स्पर्धेत मिळालेले यश महाविद्यालयासाठी विशेष अभिमानाची बाब ठरले आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व या यशातून अधोरेखित झाले आहे.
हिमांशीला या यशासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर, BPA अभ्यासक्रमात नाट्यशास्त्र शिकवणारे प्रा. ओमकार रसाळ, प्रा. आर्या वंडकर आणि प्रा. साई जिरोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
हिमांशी चौहान हिच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


