(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेल्वे स्टेशन स्टॉप परिसरात सुरू असलेल्या काँक्रीट मार्गिकेच्या कामामुळे प्रवाशांचे अक्षरशः हाल होत असून, तात्पुरत्या निवारा शेडअभावी एसटी प्रवाशांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. मूलभूत सोयीसुविधांकडे झालेल्या या उघड दुर्लक्षामुळे ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात सध्या काँक्रीट मार्गिकेचे काम वेगाने सुरू असले तरी दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीचा पूर्णपणे बळी दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे. रोज शेकडो प्रवासी एसटी बसची प्रतीक्षा करताना कडक उन्हात उभे राहत असून, वृद्ध, महिला, विद्यार्थी आणि लहान मुलांचे विशेष हाल होत आहेत. महामार्गाचे काम सुरू असताना प्रवाशांसाठी तात्पुरती निवारा शेड उभारणे ही संबंधित ठेकेदाराची प्राथमिक जबाबदारी असताना, रवी इन्फ्रा बिल्ड प्रोजेक्ट कंपनीने याकडे पूर्णतः कानाडोळा केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “कोट्यवधींची कामे घेताना सुविधा देण्याचे आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्षात प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते,” अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोट्यवधी रुपयांची विकासकामे करणाऱ्या यंत्रणांना प्रवाशांच्या मूलभूत सुविधांची जाणीव नाही का? असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडूनही दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. कामाचा वेग दाखवण्याच्या नादात प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वाढत्या तापमानात तासन्तास उन्हात उभे राहणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून निवारा शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, प्रवाशांच्या हालअपेष्टांबाबत संबंधित विभाग आणि ठेकेदार कंपनी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सुविधा नेमकी कुठे गायब झाली?
साळवी स्टॉपपासून हातखंबा पर्यंतच्या मार्गावर सुरू असलेल्या कामांदरम्यान प्रवाशांसाठी आवश्यक असलेली तात्पुरती निवारा शेडची सुविधा नेमकी कुठे गायब झाली आहे, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. हातावर मोजण्याइतके काही स्टॉप वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी प्रवाशांना भर उन्हात उघड्यावर ताटकळत उभे राहावे लागत असेल, तर संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

