(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत गेल्या तब्बल नऊ वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने कर्तव्य बजावताना रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठीही सातत्याने पुढाकार घेणारे परेश मयेकर यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर आता अधिक मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मयेकर यांची वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरक्षा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरक्षा रक्षक म्हणून सुरू झालेल्या त्यांच्या सेवाप्रवासाला आता नेतृत्वाची नवी दिशा मिळाली असून, रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्त होणारे ते पहिले अधिकारी ठरले आहेत. गेल्या नऊ वर्षांतील त्यांची कार्यतत्परता, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा अनुभव, शिस्तीवर असलेला भर आणि सेवाभावी वृत्ती यांचा विचार करून अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे मानले जात आहे. मयेकर यांच्या नेतृत्वाखाली आता १६० सुरक्षा रक्षक, ११ सुरक्षा पर्यवेक्षक आणि एक सहाय्यक सुरक्षा अधिकारी कार्यरत असणार आहेत. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, परिसरातील शिस्त, वाहन पार्किंग, गर्दीचे व्यवस्थापन तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक त्या वेळी मदत करण्याची जबाबदारी त्यांच्या पथकावर राहणार आहे.
मयेकर यांच्या कार्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्यांची भूमिका केवळ सुरक्षेपुरती मर्यादित राहिलेली नाही. रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एखाद्या विभागात जाण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांना स्वतः संबंधित विभागापर्यंत पोहोचविणे, वाहन पार्किंगची व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच रुग्णालयातील नागरिकांना आवश्यक त्या वेळी मदतीचा हात देणे, अशी कामे ते सुरक्षा पथकासोबत प्रत्यक्ष करताना दिसतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबरोबरच ‘सेवा’ हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील प्रशासकीय कामकाजाला सुरक्षा व्यवस्थेच्या पातळीवर सक्षम पाठबळ देण्याचे कामही मयेकर करत आहेत. रुग्णालयातील संवेदनशील परिस्थितीत सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच रुग्ण, नातेवाईक आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यावर त्यांचा भर असतो.
कोविड-१९ महामारीच्या काळात रुग्णालयातील कामकाज अत्यंत आव्हानात्मक बनले होते. संसर्गाचा धोका असतानाही मयेकर यांनी दिवस-रात्र कर्तव्य बजावत रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांच्या मदतीची जबाबदारी पार पाडली. या काळातील त्यांच्या सेवाभावाचीही दखल घेण्यात आली आहे. गेल्या नऊ वर्षांत रुग्णालयाच्या परिसरात काम करताना मिळविलेला प्रत्यक्ष अनुभव, सुरक्षा व्यवस्थेची जाण आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत यामुळे मयेकर यांच्याकडे आता सुरक्षा अधिकारी म्हणून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास आता १६० सुरक्षा रक्षकांच्या पथकाचे नेतृत्व करण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या नियुक्तीचे रुग्णालयातील कर्मचारी आणि सहकाऱ्यांकडून स्वागत होत आहे.


