(राजापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर मोकाट गुरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून हा प्रश्न आता गंभीर अवस्थेत पोहोचला आहे. गुरांच्या अचानक रस्त्यावर येण्यामुळे अनेक अपघात घडले, नागरिकांचा मृत्यू झाला, वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि गुरांनाही आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. नुकतेच या पार्श्वभूमीवर हायवेवर आंदोलनही झाले होते.

या गंभीर प्रश्नावर पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुखांना भेटून निवेदन सादर केले. बैठका घेऊन हा प्रश्न सुटणारा नसून तातडीने ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांचा मालक निश्चित न होणे ही कारवाईतील सर्वात मोठी अडचण असल्याचे निदर्शनास आणून देत, सर्व गुरांना टॅगिंग सक्तीचे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यामुळे गुरांचा मालक ओळखता येईल आणि जबाबदारी निश्चित करता येईल, असे मत या सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले.
प्रशासनाने या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लेखी सूचना देण्याचे आश्वासन दिले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार पशुधनांचे टॅगिंग अभियान राबविण्यात येईल, असेही सांगण्यात आले. मोकाट गुरांबाबत तक्रार आल्यास भारतीय न्याय संहितेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये राजन लाड, शरद पळसुले देसाई, प्रकाश नाचणेकर, संतोष मोंडे, अरविंद लांजेकर, आशिष मालवणकर, फारुख साखरकर, प्रल्हाद तावडे, संतोष तांबे, संकेत शिवनेकर आदींचा समावेश होता. यानंतर आमदार किरण ऊर्फ भैया सामंत, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही,” असा इशारा देत कार्यकर्त्यांनी ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

