(राजापूर / तुषार पाचलकर)
स्वराज यूथ फोरम, नागपूर यांच्या वतीने नागपूर विधानभवन येथे आयोजित युवा संसद अधिवेशनात मुंबईस्थित राजापूर तालुक्यातील सावडाव येथील सुपुत्र सिद्धेश कोरगावकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या अधिवेशनात संसदीय कामकाज, कायदे निर्मिती प्रक्रिया तसेच भारतीय संविधानातील अनुच्छेद १०५ अंतर्गत संसदीय विशेषाधिकार यावर सखोल चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान सिद्धेश कोरगावकर यांनी प्रस्थापित लोकप्रतिनिधीप्रमाणे मुद्देसूद मांडणी करत प्रभावी कामगिरी केली. त्यांच्या अभ्यासपूर्ण सहभागामुळे उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले गेले.
लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी युवा संसदेसारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सिद्धेश कोरगावकर यांच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल भाजप नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत राज्यस्तरीय दिशा समितीचे सदस्य श्री. संतोष गांगण यांनी त्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एकीकडे राजकारणाचा दर्जा घसरत असल्याची चर्चा होत असताना, अशा सकारात्मक आणि विधायक उपक्रमात सहभागी होऊन युवकांमध्ये आदर्श निर्माण केल्याबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून सिद्धेश कोरगावकर यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

