(खेड / वार्ताहर)
शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खेड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त श्री. दिलीप स. देवळेकर यांची राज्यस्तरीय ‘कोकण भूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘कोकण दीप’ मासिकाच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त १४ जून २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दादर येथील मुंबई मराठी संग्रहालय इमारतीतील प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात राज्य मंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या हस्ते श्री. देवळेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सुधीरभाऊ कदम, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्री. दिलीप देवळेकर हे दै. रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार असून महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीच्या कोकण विभागीय समितीचे सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी तसेच कोकण मराठी पत्रकार संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू आणि आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना यापूर्वीही विविध संस्था व शासनाच्या वतीने अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
‘कोकण दीप’ मासिकाच्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येत असून त्यामध्ये श्री. देवळेकर यांची निवड विशेष मानाची मानली जात आहे.

