(पोलादपूर / शैलेश पालकर)
पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात ३० एप्रिल रोजी आढळलेल्या अज्ञात मृतदेहाच्या तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, एका महिलेसह तिघा आरोपींना गजाआड करण्यात पोलादपूर पोलिसांना यश आले आहे. सतर्क तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल दोन महिने कर्नाटक सीमाभागात लपलेले दोन मुख्य आरोपी अटक केले.
३० एप्रिल रोजी जुन्या मुंबई-गोवा महामार्गालगत कशेडी घाटात एका अज्ञात इसमाचा तीन दिवस जुना मृतदेह सापडला होता. प्रेत कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या घटनेची माहिती भोगावच्या पोलीस पाटील शुभांगी राकेश उतेकर यांनी पोलिसांना दिली. पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. तुषार सुतार, पो.ना. संग्राम बामणे, सौरव जाधव यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे चारच दिवसांत पोलिसांनी अक्षय जाधव या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून मृत व्यक्तीची ओळख सुनील दादा हसे (वय ५४, रा. अंबड, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) अशी पटली. तो रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सती गावात वास्तव्यास राहत होता आणि स्वतःची वॉक्सवॅगन कार (MH15 DS 8005) भाड्याने देत उपजीविका करत होता.
खुनाचा कट आणि मुख्य आरोपींचा उलगडा
सुनील हसे याची ओळख वंदना दादासाहेब पुणेकर (वय ३६, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) हिच्याशी गाडीच्या लिफ्टच्या निमित्ताने झाली होती. हसे हा श्रीमंत असल्याचा भ्रम झाल्यामुळे वंदनाने त्याच्याशी जवळीक साधली. मात्र अपेक्षेप्रमाणे आर्थिक फायदा न झाल्याने वंदनाने मोहन पांडुरंग सोनार (वय ५४, रा. बोर्सूत, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) आणि अक्षय जाधव यांच्या मदतीने हत्येचा कट रचला.
२७ एप्रिल रोजी पहाटे, वंदनाने सुनील हसे याला गाडीत गुंगीचे औषध देऊन झोपवले आणि कराड-चिपळूण मार्गे पोलादपूरच्या दिशेने आणत असताना, गाडीच्या मागील सीटवरून गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कशेडी घाटातील दरीत फेकण्यात आला.
दोन महिन्यांनंतर मुख्य आरोपींचा छडा
घटनेनंतर वंदना आणि मोहन हे दोघे फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी अथक तपास करत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात लपलेले हे दोघे आरोपी गुप्त माहितीच्या आधारे शोधून काढले. पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पो.हवा. तुषार सुतार, पो.ना. अनुजित शिंदे, महिला पो.शि. बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या गुन्ह्याच्या यशस्वी तपासाबद्दल पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलिसांनी उत्तम कामगिरी केली असून तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
वंदना पुणेकर आणि मोहन सोनार या दोघांविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 103(1), 238, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

