(मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने २०२६-२७ या हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांची प्रतिष्ठेच्या ‘इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळत असल्याने राज्याने जागतिक ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
या पुरस्कारासाठी समुद्रकिनाऱ्यांची निवड करताना पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, जैवविविधतेचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता, आवश्यक पायाभूत सुविधा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन अशा आंतरराष्ट्रीय निकषांचा विचार करण्यात आला आहे. या निकषांची पूर्तता केल्यामुळे लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या किनाऱ्यांना हा बहुमान मिळाला आहे.
या यशामध्ये राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागासह पर्यटन विभाग, संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, बीच मॅनेजमेंट कमिटी, स्थानिक नागरिक आणि विविध यंत्रणांचे समन्वयपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.
नव्याने पुरस्कारप्राप्त झालेल्या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांचा ब्ल्यू फ्लॅग हंगाम १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या पुरस्काराचे प्रतीक असलेले आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग नेदरलँड्स येथून प्राप्त होत असून, ते राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे सुपूर्द केले जाणार आहेत. त्यानंतर संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
२०२६-२७ या हंगामासाठी देशातील एकूण २२ समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मान्यता मिळाली आहे. यामध्ये १३ समुद्रकिनाऱ्यांच्या मान्यतेचे नूतनीकरण करण्यात आले असून, ९ नवीन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. या राष्ट्रीय यादीत महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांनी प्रथमच स्थान मिळवले आहे.
या यशाबद्दल पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील अन्य पात्र समुद्रकिनाऱ्यांचाही आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करण्यासाठी ब्ल्यू फ्लॅग कार्यक्रमाचा उपयोग केला जाणार आहे. या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबरोबरच किनारपट्टीवरील स्थानिक रोजगार, पर्यटन व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय सन्मानाबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अभिमान व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार मिळणे, ही राज्याच्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेली जागतिक पातळीवरील पावती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधण्यासाठी कटिबद्ध आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळेल, तसेच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. भविष्यात राज्यातील अन्य पात्र समुद्रकिनाऱ्यांचाही आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करून महाराष्ट्राला शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचे अग्रगण्य केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
ब्ल्यू फ्लॅग ही केवळ पुरस्काराची ओळख नसून पर्यावरणपूरक विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि शाश्वत पर्यटनासाठी दिली जाणारी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मान्यता आहे. लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या किनाऱ्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांना जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळण्यास मदत होणार आहे.


