(रत्नागिरी / वार्ताहर)
राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेचा ठसा उमटवत रत्नागिरी शहराने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. देशातील किनारपट्टीवरील शहरांच्या श्रेणीत (Coastal Cities Category) रत्नागिरीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल नवी दिल्ली येथे आज आयोजित भव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रत्नागिरी नगरपरिषदेला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी शहराच्या वतीने नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, पाणीपुरवठा सभापती निमेश नायर आणि स्वच्छता सभापती राकेश नागवेकर यांनी मंचावर उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारला.
शहरातील स्वच्छतेसाठी रत्नागिरी नगरपरिषदेने विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्न केले. घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, समुद्रकिनारे आणि सार्वजनिक परिसराची नियमित स्वच्छता राखणे, ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करणे तसेच प्लास्टिकमुक्तीसाठी विशेष मोहीम राबविणे अशा उपक्रमांवर भर देण्यात आला होता.
नगरपरिषद प्रशासनाचे नियोजन, स्वच्छता कर्मचाऱ्यांची मेहनत आणि रत्नागिरीकर नागरिकांचा सक्रिय सहभाग या सामूहिक प्रयत्नांमुळे शहराला राष्ट्रीय स्तरावर हा बहुमान मिळाला आहे. या यशाबद्दल रत्नागिरी शहरासह संपूर्ण कोकण पट्ट्यातून नगरपरिषद प्रशासन, पदाधिकारी आणि स्वच्छता दूतांचे अभिनंदन होत आहे. राष्ट्रीय पुरस्कारामुळे स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरी घडविण्याच्या संकल्पाला अधिक बळ मिळाले आहे.


