(रत्नागिरी)
रत्नागिरी येथे आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारुतीमंदिर येथील शिवसृष्टीमध्ये स्थानापन्न करण्यात आलेल्या मावळ्यांची विटंबना झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या धारकऱ्यांनी या पुतळ्याची अवस्था पाहिल्यावर पोलीस आणि नगर परिषदेला कळविले. यानंतर या पुतळ्यांवर आता कागदाचे आवरण घालण्यात आले आहे.
आज सकाळी मारुतीमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ असलेल्या शिवसृष्टीतील काही मावळ्यांची विटंबना झाल्याचे निदर्शनास आल्यावर ही बातमी सर्वत्र पसरली. विटंबना करणाऱ्या आरोपीला तत्काळ पकडून कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, विजय खेडेकर, अभिजीत दुडे, प्रशांत सुर्वे, दिपक पवार यांनी पोलिसात निवेदन दिले आहे. रत्नागिरी नगरपालिकेने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका संशयित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.

