उद्या बुधवार दि.10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून गणला गेला आहे. यानित्ताने प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघिमित्रा फुले यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती.
आत्महत्या याचाच अर्थ स्वतःचा जीव घेणे. आत्महत्येची कृती करण्यामागे आत्महत्येचे विचार येणे म्हणजेच स्वतःचा जीव घेण्याचा विचार येणे. सध्या दररोज प्रसार माध्यमांद्वारे अशा घटना वाचायला व ऐकायला मिळतात.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दरवर्षी 7 लाख 20 हजार लोक आत्महत्येने मृत्यूमुखी पावतात. आत्महत्या हे जगभरात सर्वाधिक मृत्यूचे तिसरे कारण असून त्यात 15 ते 29 वयोगटाचा अधिक समावेश आहे. जागतिकस्तरावर 73 टक्के आत्महत्या ही कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळून येते. भारतात देखील आत्महत्या होतात. सर्वाधिक मृत्यूचे तिसरे कारण असून दरवर्षी एक लाखाहूनही जास्त लोक आत्महत्या करतात. ज्यात किशोरवयीन मुलांचा आकडा सर्वात जास्त आहे.
10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामागे असा उद्देश आहे आत्महत्येचे विचार येणाऱ्या लोकांमध्ये व समाजामध्ये जनजागृती होऊन अशा व्यक्तींना त्वरित मदत मिळून आत्महत्या मुळे होणारे मृत्यू टाळावे. यावर्षी देखील आपण “Changing the narrative on Suicide” (आत्महत्येबद्दल दृष्टिकोन बदलणे) ही त्रैवार्षिक थीम साजरी करत आहोत. समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये या विषयाचे सखोल ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे ज्यामुळे आपण आत्महत्येमुळे होणारा मृत्यू सहज टाळू शकतो.
सर्वप्रथम हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की, आत्महत्येचे विचार मनात येणे हे टोकाच्या भावनिक अस्वस्थतेचे लक्षण असून ही अवस्था कोणालाही अनुभवायला येऊ शकते. त्यामागे जैवी-मनो-सामाजिक अशी तीन प्रकारची मुख्य कारणे असू शकतात. जैविक पातळीवर मेंदूतील सिरोटोनिन द्रव्य व काही जनुके किंवा कौटुंबिक इतिहास याच्याशी निगडित मानसिक आजार असल्याचे अनेक अभ्यास आता झाले आहेत. मानसिक पातळीवर स्वभाव दोष, टोकाचा उतावीळपणा, सामाजिक पातळीवर आर्थिक विषमता, व्यसनाधीनता, अयशस्वी प्रेम संबंध, अपयश, प्रिय किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, कामाचा ताणतणाव, लैंगिक शोषणाचा बळी या गोष्टीच्या मिश्रणातून हे विचार जन्म घेतात.
आत्महत्या आणि आत्मघातकी विचारांची चिन्हे पुढीलप्रमाणे आहेत. मृत्यूबद्दल बोलणे आणि मरणाची इच्छा आहे असं सांगणे, चिंतेत किंवा बेपर्वाईने वागणे, कुटुंब आणि मित्रांना निरोप, स्वतःला वेगळे करणे, दारू व अमली पदार्थांचे अति सेवन करणे, आयुष्यात पुढे जाण्याचे कारण नाही असे वाटणे, झोपेचा त्रास जाणवतो, प्राणघातक वस्तूंचा उदाहरणार्थ गोळ्या, विष यांचा साठा करणे.
आत्मघातकी विचारांशी संबंधित जोखीम घटक- योग्य माहिती आणि जागरूकतेचा अभाव, योग्य संवादाचा अभाव, एकटेपणा, अपेक्षा पूर्ण न होण्याची भीती, अपराधीपणाची भावना, राग किंवा आवेगावर नियंत्रण नसणे, ज्ञानाचा अभाव (गंभीर घातकी बाब), अपुरा सामाजिक व कौटुंबिक आधार, दुर्लक्ष किंवा तुटलेले कुटुंब, उपचारांसाठी मदत न घेणे, समस्या असल्यास नकार, चुकीची धारणा किंवा घटनेचा गैरसमज, अनुचित किंवा वाईट आदर्श, मानसिक आजार हे कलंक समजणे.
आत्महत्येसारख्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय हे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्तपणे काम करते. या रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य संघामध्ये उपअधीक्षक व मनोविकार तज्ञ वर्ग 1 डॉ. हरिणाक्षी गोसावी, मनोविकार तज्ञ डॉ. संजय कलकुटगी व डॉ. राहुल मोगले, वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तवर, व्यावसोपचार तज्ञ डॉ प्रिन्सी टी, अधिसेविका श्रीमती नाचणकर व मनोरुग्णतज्ञ परिचारिका रितिका गावडे एकजूट होऊन काम काम करतात.
रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण विभागात औषधोपचार व वैयक्तिक समुपदेशन, गरजेच्या रुग्णास आंतररुग्ण सेवा व ओषधोपचार, आंतररुग्ण विभागात बारकाईने निरीक्षण, सुरक्षित वातावरण, व्यावसोपचार विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम व डे केअर सेंटर ची सुविधा, मानसिक आजार आत्महत्या प्रतिबंध, टेलिमानस हेल्पलाइन (१४४१६) अशा प्रमुख विषयांवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. 14416 हा टोल फ्री क्रमांक असून रुग्ण व नातेवाइक स्वतःच्या घरातून मार्गदर्शन घेवू शकतात. डीएमएचपी (डिस्ट्रीक मेंटल हेल्थ प्रोग्राम) मार्फत जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मार्गदर्शन व उपचार देण्यात येत आहेत.
– डॉ. संघमित्रा फुले
अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी

