(गुहागर)
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर योगेवाडी फाट्याजवळ काल (दि. १९ ऑगस्ट) सकाळी झालेल्या भीषण अपघातात गणपतीपुळेकरिता निघालेल्या एसटी बस व मालवाहू कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा महिला प्रवासी जखमी, तर बसचालक गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात सकाळी सात वाजता घडला. कवठेमहांकाळ बसस्थानकाची एसटी बस जाखापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील भाविकांना घेऊन गणपतीपुळेकरिता निघाली होती. मात्र, योगेवाडी फाट्याजवळ समोरून आलेल्या कंटेनरशी बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात बसचालक गोरख तुकाराम पाटील (४५) गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तर जखमी महिलांमध्ये मालन दत्तात्रय पाटील (७०), काजल विशाल पाटील (३०), रुक्मिणी भीमराव पवार (५५), कमल वसंत पवार (६०), सुलाबाई गणपतराव पाटील (६०), रंजना दिलीप पाटील (४५), शालन वसंत पाटील (५५) तसेच आदिरा विशाल पाटील (७) या प्रवाशांचा समावेश आहे. सर्वांना प्राथमिक उपचारासाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
धडक झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ बचावकार्य राबविले. काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. योगेवाडी फाटा हे ठिकाण वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक मानले जाते. या परिसरात यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, स्थानिकांकडून रस्त्याच्या दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजनांची मागणी सातत्याने होत आहे. प्राथमिक तपासात कंटेनरचा जादा वेग किंवा चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी तासगाव पोलिसांनी चौकशी सुरू केली असून कंटेनर चालकाचीही कसून चौकशी केली जात आहे.

