( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी एसटी डेपोमध्ये मार्ग तपासणीसाठी असलेले वाहन हे प्रत्यक्षात प्रवाशांच्या सोयीसाठी, बसेसच्या तपासणीसाठी आणि वाहतूक व्यवस्थेतील शिस्त राखण्यासाठी वापरले जाणे अपेक्षित आहे. मात्र वास्तव वेगळेच असून हे वाहन काही तेथील अधिकारी स्वतःच्या खासगी कामांसाठी वापरत असल्याची चर्चा जोर धरत आहे.
आधीच एसटी महामंडळ तोट्यात असताना सरकारी संसाधनांचा असा उघड उघड गैरवापर होणे हे धक्कादायकच म्हणावे लागेल. मार्ग तपासणी वाहनाने प्रवास करणारे अधिकारी आता त्याच वाहनाचा खासगी कामांसाठी वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे रत्नागिरी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी वाहनाचा खासगी कामासाठी वापर करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना कोणी दिला, या गैरवापरावर देखरेख कोण ठेवत आहे, इंधन, चालकाचा वेळ आणि सार्वजनिक पैसा वाया घालवण्याची जबाबदारी कोण घेणार आणि या अधिकाऱ्यांवर चौकशी होऊन कारवाई होणार का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. प्रवाशांसाठी असलेले वाहन खासगी टॅक्सीप्रमाणे वापरले जाणे हा केवळ गैरव्यवहार नसून भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, एसटी डेपोमध्ये बसेसची टंचाई, प्रवाशांची गैरसोय, वेळापत्रकातील गोंधळ या समस्या कायम असताना अधिकारी मात्र मार्ग तपासणी वाहनाच्या गैरवापरात मश्गूल असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने यांच्यावर अंकुश कोण ठेवणार आणि हा प्रकार गुलदस्त्यातच राहणार की ठोस कारवाई होणार, असे सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

