(संगमेश्वर / एजाज पटेल)
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) काही विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. या बसमध्ये गणेशभक्तांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होती. मात्र सण संपून काही दिवस झाले तरीही या गाड्यांवरचे “गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा” असे बॅनर अद्यापही काढले गेलेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात धावणाऱ्या या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट द्यावे लागणार की मोफत प्रवासाचा लाभ मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
“सण गेला सरून…” ही म्हण यावेळी नेमकी लागू पडते. एसटी ही शासनाची मालमत्ता असली तरी जाहिरातींमध्ये सरकारची उदारता दिसते, तर प्रत्यक्षात त्याचा परिणाम गोंधळात होतो. पैसा सार्वजनिक तिजोरीतून खर्च होतो, पण प्रसिद्धी मात्र सत्ताधाऱ्यांची होते, अशी टीका स्थानिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, संगमेश्वर ते करजुवे या मार्गावर धावणाऱ्या अशाच एका बसमध्ये प्रवासी आणि वाहक यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळाली. एका प्रवाशाने बॅनर दाखवून “मी बॅनर वाचून मोफत प्रवासासाठी बसलो आहे, मला तिकीट द्यायचं नाही” असा आग्रह धरला. यावरून वाहक आणि प्रवासी यांच्यात चांगलीच बाचाबाची रंगली.
स्थानिक पातळीवर या प्रकारची चर्चा रंग घेत असून, नेमके नियम काय आणि प्रवाशांनी कोणावर विश्वास ठेवावा, याबाबतची स्पष्टता एसटी प्रशासनाने तातडीने देणे आवश्यक असल्याचे मत नागरिक मांडत आहेत.

