(रत्नागिरी)
मिरजोळे एमआयडीसीमधील देहव्यापार प्रकरणातील संशयित सुनीलकुमार प्रभू (वय ६०, रा. मिरजोळे एमआयडीसी) याला सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. प्रभू यांच्यावर भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम १४३ (३), ३(५) तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा, १९५६ चे कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
१८ सप्टेंबर २०२५ रोजी मिरजोळे एमआयडीसी परिसरात एका नेपाळी महिलेमार्फत दोन तरुणींकरवी देहव्यापार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारवाईत गीता थापा या नेपाळी महिलेविरुद्धही गुन्हा दाखल झाला. तपासात देहव्यापारासाठी वापरला गेलेला ६९ नंबरचा प्लॉट प्रभू यांच्या नावावर असल्याचे समोर आले, तसेच गीता थापा हिने प्रभू यांना ऑनलाइन पैसे पाठवले होते, अशी माहितीही मिळाली.
जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जात प्रभू यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्यात सहभाग घेतलेला नाही. ते सुशिक्षित असून, ६० वर्षांचे आहेत. त्यांची ९५ वर्षांची आई आणि अविवाहित बहिण त्यांच्यासोबत ते राहतात. प्रभूंच्या म्हणण्यानुसार गीता थापा ही मोलकरीण म्हणून ठेवलेली होती आणि तिने स्वतःच्या खोलीचा गैरवापर केला. गुन्हेगारी इतिहास नसल्यामुळे, तसेच वय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या लक्षात घेता न्यायालयाने प्रभू यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

