(मुंबई)
रेल्वे पोलिसांच्या मोठ्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, गेल्या पाच महिन्यांत तब्बल १३ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एका वरिष्ठ निरीक्षकासह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. जीआरपी आयुक्त राकेश कलसागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या कारवायांना गती मिळाली. त्यांच्या कार्यकाळातच सात पोलिसांवर कारवाई झाली आहे.
कसा चालायचा खंडणीचा खेळ ?
- हे रॅकेट मुख्यतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून आलेल्या प्रवाशांना लक्ष्य करत असे.
- मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, बांद्रा टर्मिनस, बोरीवली, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर ही प्रकरणे सर्वाधिक आहेत.
- तपासणीच्या नावाखाली प्रवाशांना थांबवून त्यांच्याकडील रोख रक्कम वा दागिन्यांवर संशय घेतला जाई.
- नंतर त्यांना सीसीटीव्ही नसलेल्या जीआरपी रूममध्ये नेऊन विचारपूस केली जात असे.
- प्रवाशांना सांगितले जाई की, “हे पैसे किंवा दागिने तुमचेच आहेत हे सिद्ध करा.”
- सिद्ध न झाल्यास त्यांचे सामान जप्त करून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली जाई.
- अनेक प्रवाशांना नाइलाजाने पैसे देऊनच सुटका करून घ्यावी लागली. काही प्रकरणांत मारहाणीचाही समावेश आहे.
पुढील कारवाईची शक्यता
या प्रकरणात अद्याप चौकशी सुरू असून, आणखी काही पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुतेक पीडित हे लांब पल्ल्याचे प्रवासी असल्याने ते पोलिस ठाण्याच्या कटकटीत न अडकता गप्प बसत, आणि याचाच फायदा आरोपी पोलीस घेत होते.

