(गुहागर / सचिन कुळये)
गुहागर तालुक्यातील नरवण गावात कुणबी महिला मंडळाच्या वतीने प्रथमच मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या प्रसंगी नरवण कुणबी ग्रामस्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्वाती शांताराम कुळये, नरवण कुणबी ग्रामस्थ स्थानिक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळ गोताड, सरपंच श्री. संतोष मोरे, तसेच सौ. संयुक्ता मोरे आणि सौ. शुभांगी गोताड यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील सर्व वाड्यांचे प्रमुख, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. याच पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच नरवण येथील कुणबी महिला मंडळाने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करून एक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवला.
कार्यक्रमाला निर्मल नरवण ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, तसेच गावातील नागरिक डॉ. करुणा देवाळे यांची उपस्थिती लाभली. नरवण गावासह पाचणैवाडी, धरणवाडी, सनगरेवाडी, धनावडेवाडी, रामवाडी, गवाणवाडी आणि फटकरेवाडी येथील महिला मंडळांनीही लक्षणीय उपस्थिती नोंदवली.
हळदी-कुंकू हा सुवासिनींचा पारंपरिक सण असून हळद आणि कुंकू सौभाग्य, शक्ती आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. या निमित्ताने महिला एकमेकींना हळद-कुंकू लावून परस्पर सन्मान व्यक्त करतात. एकमेकांमधील स्त्री तत्त्वाचा आणि देवी तत्त्वाचा आदर करण्याची ही सुंदर परंपरा आहे.
पूर्वीच्या काळी महिलांना सामाजिक सहभागाच्या संधी मर्यादित असताना हळदी-कुंकू हे महिलांसाठी संवाद, आपुलकी आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे हक्काचे व्यासपीठ ठरत असे. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ या संदेशातून जुने मतभेद विसरून नाती अधिक दृढ केली जातात. या वेळी वाण देण्याची परंपराही जपण्यात आली. वाण म्हणजे केवळ भेटवस्तू नसून दान, सद्भावना आणि समृद्धीचे प्रतीक असल्याची भावना यामागे आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना सामाजिक संदेश देत समारंभाची सांगता करण्यात आली. प्रथमच आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरला असून गावात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

