(पुणे)
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या १९ वर्षीय आयुष कोमकरचा सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. या वेळी परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
कारागृहातून वडिलांना आणले
मृत आयुषचे वडील गणेश कोमकर हे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असून, ते सध्या नागपूर कारागृहात आहेत. मुलाच्या अंत्यविधीसाठी त्यांना खास परवानगीने पुण्यात आणण्यात आले होते. अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्या गणेश कोमकर यांच्या हातात असलेले एक ग्रिटींग कार्ड सर्वांच्या नजरा खेचून गेले.
आयुषचे वडिलांसाठी ग्रिटींग कार्ड
आयुषने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हे ग्रिटींग तयार केले होते. त्यात “आय लव्ह यू पप्पा” असा संदेश लिहिला होता, तसेच आयुष आणि गणेश कोमकर यांचे फोटो चिकटवले होते. हेच ग्रिटींग कार्ड गणेश कोमकर यांनी मुलाच्या अंत्यविधीच्या वेळी हातात धरले होते. या घटनेने वातावरण अधिक भावनिक झाले.
हत्या प्रकरणात दोन आरोपी अटकेत
शनिवारी नाना पेठेतील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये आयुष कोमकरवर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

