(मुंबई)
राज्यातील अकरावी प्रवेशाच्या अखेरच्या फेरीची निवडयादी शुक्रवारी जाहीर झाली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आज (शनिवार) प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे. यंदा पहिल्यांदाच ही प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे.
राज्यातील एकूण ९,५३५ महाविद्यालयांमध्ये २१ लाख ५९ हजार २३२ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी १४ लाख ७९ हजार ६५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आतापर्यंत ११.३२ लाख विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश (CAP) तर १.६६ लाख विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशाद्वारे प्रवेश निश्चित केला आहे.
तथापि, अजूनही ८ लाख ६० हजार ७५८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी ही अखेरची संधी गमावू नये, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी हीच फेरी अखेरची असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, यानंतरही जागा रिक्त राहिल्यास मुदतवाढ मिळेल का याबाबत अद्याप निश्चितता नाही.

