(नवी दिल्ली)
सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करत युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना अटक केली आहे. ही अटक १७ मे रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावरून करण्यात आली. ईडीच्या माहितीनुसार, ही कारवाई तब्बल ₹६,२१० कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणुकीप्रकरणी करण्यात आली आहे.
गोयल यांना अटक केल्यानंतर त्यांना पीएमएलए (PMLA) न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना उद्या २१ मेपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक कोलकाता स्थित मेसर्स कॉनकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेड (CSPL) या कंपनीशी संबंधित आहे. या प्रकरणात युको बँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्जरकमेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे. गोयल यांच्या युको बँकेतील कार्यकाळात या कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज सुविधा मंजूर करण्यात आल्या होत्या, ज्या नंतर वळवून इतरत्र हस्तांतरित केल्या गेल्या.
ईडीच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, या निधीचा वापर सीएसपीएलने उद्देशबाह्य स्वरूपात केला. तसेच, गोयल यांना यामधून बेकायदेशीर आर्थिक फायदा झाल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यांना रोख रक्कम, स्थावर मालमत्ता, महागड्या वस्तू, हॉटेल बुकिंग यांसारखे विविध स्वरूपाचे लाभ मिळाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच, हा निधी शेल कंपन्या, बनावट व्यक्ती आणि कुटुंबीयांच्या माध्यमातून वळवण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
एप्रिलमध्ये छापे, मालमत्ता जप्त
या प्रकरणात एप्रिल २०२५ मध्येच ईडीने सुबोध कुमार गोयल आणि संबंधित इतर व्यक्तींच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती. या छाप्यात गोयल यांच्याकडून मिळालेली बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या तपासामुळे या कर्ज फसवणूक प्रकरणातील अन्य आरोपींवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.