(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षा प्रकरणातील जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा ह्या मागणीसह असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवर सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध कांबळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंदोलनस्थळी महिला, युवक आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर करून अमानवी लाठीचार्ज केला. या घटनेचा त्यांनी निषेध नोंदविला.
कांबळे यांनी म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेत आंदोलन हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसी कारवाई केल्याचे वृत्त समोर येणे चिंताजनक आहे. दिल्लीतील आंदोलनात सहभागी असलेल्या सोनम वांगचुक यांचे गेल्या वीस हून अधिक दिवस सुरू असलेल्या उपोषण सोडण्यास केंद्र सरकारमधील एकही सदस्य सकारात्मक चर्चा सुरू न करणे म्हणजेच मोदी सरकार तरुणांना प्रवृत्त करत आहे. ही तमाशाही देशाला घातक असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यापुढे त्यांनी सांगितले, संवादाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी दडपशाहीची भूमिका घेतल्यास लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होण्याची भीती आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून केंद्र सरकारने तातडीने चर्चेची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कांबळे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना, “जनभावनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लोकशाहीत अखेरीस जनतेलाच उत्तर द्यावे लागते. जनताच योग्य वेळी आपला कौल देऊन भूमिका स्पष्ट करेल,” असेही मत व्यक्त केले आहे. दिल्लीतील या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध संघटना, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून समर्थन तसेच निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत असून, या विषयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा अधिक तीव्र होत आहे.

