(राजापूर / तुषार पाचलकर)
अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचल येथेच स्थापन व्हावे, या मागणीला अधिक बळ देण्यासाठी पाचल व्यापारी संघटना, ग्रामपंचायत पाचल आणि पाचल तालुका निर्मिती कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यापारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, कृती समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्ये झाल्यास संपूर्ण पंचक्रोशीच्या विकासाला गती मिळेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाचलची भौगोलिक, सामाजिक आणि प्रशासकीय उपयुक्तता अधोरेखित केली. शिक्षण, व्यापार, बँकिंग, कृषी सेवा, शासकीय सुविधा आणि दळणवळणाचे केंद्र म्हणून पाचलची ओळख असून, दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी येथे येतात. त्यामुळे अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्ये झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कृती समितीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, “अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी ही कोणत्याही राजकीय व्यक्तीची नसून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची तसेच पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासाची मागणी आहे.”
व्यापारी वर्गालाही गावाच्या विकासात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. अप्पर तहसीलदार कार्यालयामुळे नागरिकांची वर्दळ वाढून व्यापाराला चालना मिळेल, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
बैठकीत व्यापारी संघटनेने कृती समितीच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा जाहीर करत, अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी सुरू असलेल्या आंदोलनात खंबीरपणे सहभागी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत विरोधकांकडून पसरविण्यात येत असलेल्या “पाचलमध्ये शासकीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध नाही” या दाव्यालाही उत्तर देण्यात आले. कृती समितीने उपलब्ध जागांबाबतची माहिती आणि पुरावे उपस्थितांसमोर सादर करत हा दावा निराधार असल्याचे स्पष्ट केले. उपस्थित व्यापाऱ्यांनीही अफवांवर विश्वास न ठेवता तथ्यांवर आधारित माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला.
यावेळी सरपंच बाबालाल फरास यांनी ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “पाचल ग्रामपंचायत व्यापारी वर्गाच्या प्रत्येक विधायक उपक्रमाला सहकार्य करत आली आहे आणि भविष्यातही गावाच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका कायम ठेवेल.” त्यांनी पाचलमध्ये उपलब्ध जागा आणि नियोजनबद्ध विकासामुळेच येथे मोठी बाजारपेठ उभी राहिल्याचे नमूद करत, जागेअभावी कार्यालय होऊ शकत नाही हा दावा फेटाळून लावला.
बैठकीत व्यापाऱ्यांनीही अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्ये झाल्यास शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाचतील, तसेच प्रशासकीय सुविधा ग्रामीण भागाच्या अधिक जवळ उपलब्ध होतील, असे मत व्यक्त केले. बैठकीच्या शेवटी पाचल व्यापारी संघटनेने “ही लढाई कोणाच्या विरोधातील नसून विकासासाठीची आहे. गावाच्या न्याय्य हक्कासाठी व्यापारी वर्ग कृती समितीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” अशी भूमिका जाहीर केली.
या बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे, सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पाचल तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष अशोक सक्रे, कार्याध्यक्ष किशोरभाई नारकर, कार्यालयीन सचिव तुषार पाचलकर, करकचे सरपंच सुरेश ऐनारकर, पांगरीचे माजी सरपंच सुनील जाधव, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते बाळा सावंत यांच्यासह व्यापारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीमुळे व्यापारी संघटना, ग्रामपंचायत आणि कृती समिती यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाला असून, अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्ये स्थापन झाल्यास संपूर्ण पंचक्रोशीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

