(रत्नागिरी)
शहरातील आठवडा बाजारात गटाराचे सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याने येथील नागरिकांसह भाजी व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील गटार तुंबत असल्याचे प्रकार समोर येत असून त्यातील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.
आठवडा बाजारात नागरिकांची तसेच वाहनांची येथून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. येथील बाजारात अनेक बाहेरील व्यापारी येऊन आपला माल विक्री करतात. रोजच्या रोज भाजीपाला खरेदीसाठी येथे येणाऱ्यांची संख्या देखील अधिक असते. मात्र गटाराचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. ठिकठिकाणी पाणी साचत असल्याचे दिसून येत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून नागरीकांना ये-जा करावी लागत आहे. तुंबलेले गटाराचे पाणी रस्त्यावर आले तरीहि संबधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. रत्नागिरी स्मार्ट सिटी करण्यापूर्वी शहरातील गटारांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गटारातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने वाहने ये जा करताना नागरिकांच्या अंगावर घाण पाणी उडते. त्यामुळे येथील समस्येची पालिकेने तत्काळ दखल घेऊन परिसरातील चेंबर तुंबून घाण पाणी रस्त्यावरून वाहणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी व्यापाऱ्यासह नागरिकांमधून होत आहे.