(नवी दिल्ली)
आधार कार्डसंदर्भात UIDAI ने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला असून, हॉटेल्स, इव्हेंट ठिकाणे, सोसायटी किंवा कोणत्याही सार्वजनिक स्थळी आधार कार्डची फोटो कॉपी (Xerox) घेण्यावर पूर्ण बंदी लागू केली जाणार आहे. आधारची कॉपी जमा करून ठेवणे हा विद्यमान आधार कायद्याचा भंग असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. UIDAI लवकरच नवी डिजिटल पडताळणी प्रणाली लागू करत असून, पेपर-बेस्ड आधार व्हेरिफिकेशन पूर्णपणे बंद केले जाणार आहे.
आता आधारची झेरॉक्स नाही – नवी डिजिटल प्रक्रिया अनिवार्य
नव्या नियमांनुसार:
- हॉटेल, इव्हेंट ठिकाणे, सोसायटी, रिटेल आऊटलेट्स आधारची फोटोकॉपी मागू शकत नाहीत.
- आधारच्या कॉपी मोबाईल गॅलरी किंवा व्हॉट्सअॅपमध्ये राहिल्यास डेटा गैरवापराचा धोका वाढतो.
- त्यामुळे आधारची PDF किंवा फोटो देण्याची पद्धतही रद्द होणार आहे.
UIDAI आधीच स्पष्ट केले आहे की हॉटेल्स किंवा सिनेमागृहात आधारची कॉपी घेणे बेकायदेशीर आहे.
QR कोड किंवा आधार अॅपद्वारे पडताळणी
UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले की आधार पडताळणी आता QR कोड स्कॅनिंग, किंवा नव्याने विकसित होणाऱ्या Aadhaar Mobile Application द्वारे केली जाणार आहे. या प्रणालीसाठी संस्थांना नोंदणी करून API access मिळवावा लागणार आहे. तसेच ऑफलाइन ऑथेंटिकेशनही अनिवार्य असेल.
पेपरलेस आधार पडताळणी; डेटा लीकची शक्यता शून्य
नव्या डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे:
- पेपर बेस्ड कॉपीचा वापर शून्य
- डेटा लिक किंवा गैरवापर टळणार
- Digital Personal Data Protection कायद्याची अंमलबजावणी सुलभ
- सेंट्रल सर्व्हरला कनेक्ट न करता ‘अॅप-टू-अॅप’ पडताळणी पूर्ण होणार
UIDAI सध्या या प्रणालीचे बेटा टेस्टिंग करत आहे. ही प्रक्रिया विमानतळ, रिटेल आऊटलेट्स, हॉटेल्स अशा अनेक ठिकाणी लागू होणार आहे. UIDAI च्या नव्या नियमांमुळे नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण होणार असून, आधार माहितीचा गैरवापर होण्याचा धोका जवळपास पूर्णपणे नाहीसा होणार आहे.

