(मुंबई / वृत्तसंस्था)
वडाळ्यातील भूखंडासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून मुंबईतील केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (CPWD) कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना CBIकडून अटक करण्यात आली आहे. या व्यवहारातील लाचेची रक्कम ७० लाख रुपयांवर निश्चित झाल्यानंतर त्यापैकी ५० लाख रुपये स्वीकारताना आरोपींना पकडण्यात आले. CPWD अभियंत्याच्या नातेवाईकाला ५० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात नवी मुंबईतील वाशी येथे कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्यालाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईतील रिअल इस्टेट ग्रुपचा उपाध्यक्ष, मॅनेजर आणि NOC मागणाऱ्या फर्मचा पार्टनर यांनाही अटक झाली आहे. या कारवाईत ५० लाख रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
तपासादरम्यान, डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंद न करता ५० लाख रुपयांच्या बदल्यात संबंधित भूखंडासाठी NOC देण्यात आल्याचे समोर आले आहे. उर्वरित २० लाख रुपये आठवड्यानंतर देण्याचे ठरले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
कारवाई पुढे नेत CBIने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील आरोपींच्या ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये ५० लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेसह आणखी ५३.८७ लाख रुपयांची रोकड आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना आज मुंबई CBI विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.


