मथुरा येथे देशातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय उभारले जाणार आहे. हे संग्रहालय पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठच्या कॅम्पसमध्ये साकार होणार असून, त्यासाठी आवश्यक जमीन निश्चित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषदच्या पुढाकाराने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात असून, यामुळे मथुराला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळणार आहे.
या संग्रहालयाचा मुख्य उद्देश गायींचे बहुआयामी महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे. गायीचे धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक फायदे नागरिकांना समजावून सांगण्यासाठी परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम या संग्रहालयात पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
संग्रहालयात देशभरातील विविध गायींच्या जाती आणि लुप्तप्राय प्रजातींचे सुमारे 100 डिजिटल तसेच प्रतीकात्मक मॉडेल्स सादर करण्यात येणार आहेत. यासोबतच दूध आणि दूधापासून तयार होणारी दही, चीज, तूप यांसारखी उत्पादने, त्यांचे पोषणमूल्य, तसेच दूध उत्पादन वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धती यांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. गायीवर आधारित अर्थव्यवस्था, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक शेती याबाबतही या संग्रहालयात विशेष दालन असणार आहे.
भारतीय परंपरेत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून, सनातन संस्कृतीत तिचं स्थान अत्यंत पूजनीय आहे. गाय ही केवळ कृषी अर्थव्यवस्थेचा आधार नसून, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचं या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार हा प्रकल्प साकार होत असून, त्यामुळे मथुरा हे शहर धार्मिक पर्यटनासोबतच सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टीनेही अधिक समृद्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालयामुळे देशभरातील पर्यटक, अभ्यासक आणि संशोधक मथुराकडे आकर्षित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

