(नवी दिल्ली)
२०१८ नंतर प्रथमच काल रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग आला. हे ग्रहण संपूर्ण भारतात स्पष्ट दिसले आणि ते साध्या डोळ्यांनीही सहज पाहता आले. या खगोलीय घटनेचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील खगोलप्रेमींनी उत्साहाने गर्दी केली.
ग्रहण सुरू होताच पांढरा-शुभ्र चंद्र हळूहळू पृथ्वीच्या सावलीत झाकोळू लागला. काही वेळात तो पूर्णतः अंधारात गेला आणि नंतर लालसर रंग धारण करू लागला. या दृश्यामुळे आकाशात मोहक आणि अद्वितीय ‘ब्लड मून’ प्रकट झाला.
महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत हजारो लोकांनी छतावरून, मोकळ्या मैदानातून, तसेच दुर्बिणीद्वारे हा अद्भुत देखावा पाहिला. काही वेळासाठी चंद्र पूर्णपणे दृष्टीआड झाला होता, परंतु सावली हलताच तो पुन्हा लालसर उजेडात दिसू लागला.
विशेष म्हणजे, सर्वांत आधी केरळच्या तिरुवनंतपुरम येथे लालसर चंद्राचा अद्भुत नजारा दिसला. दिल्लीतही ‘ब्लड मून’चा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. चंद्राच्या या रूपांतराने खगोलप्रेमींना थरारक अनुभव लाभला. भारतातील अनेक भागात रविवारी रात्री 9.58 ते मध्यरात्री 1.26 दरम्यान चंद्रग्रहण दिसलं आहे. आकाश स्वच्छ असल्याने हे चंद्रग्रहण देशातील विविध भागात स्पष्ट दिसून येत होते.
चंद्रग्रहण म्हणजे काय? : जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या बरोबर मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, ज्यामुळं चंद्रग्रहण (Lunar Eclipse) होतं. ही घटना विशेष आहे कारण हे ग्रहण भारताच्या सर्व भागांतून पाहता आलं. हे ग्रहण अतिशय तुलनेनं दुर्मिळ आहे. यापूर्वी असं चंद्रग्रहण 2018 मध्ये झालं होतं, आणि यानंतर असंच ग्रहण 31 डिसेंबर 2028 रोजी दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञ, विशेषतः वातावरणीय शास्त्रज्ञ, या घटनेच्या रंगाचं विश्लेषण करून वातावरणातील धूळ आणि एरोसोलची माहिती मिळवतात.

