(मुंबई)
विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान कृषिमंत्री मोबाईलवर रमी खेळत असल्याच्या प्रकरणात राजीनाम्याची मागणी केल्यामुळे मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचं राजकीय पुनर्वसन अवघ्या महिन्याभरात करण्यात आलं आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या नेत्यांच्या उपस्थितीत सूरज चव्हाण यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आलं.
रमी प्रकरणाची पार्श्वभूमी : राजीनाम्याची मागणी आणि मारहाणीची घटना
पावसाळी अधिवेशन सुरू असताना तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळताना दिसून आले होते. या प्रकाराच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलने झाली. अशाच एका कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात, लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोरच पत्ते फेकून निषेध व्यक्त केला.
या घटनेनंतर चिडलेल्या सूरज चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विजय घाडगे यांना कोपरापासून ढोपरापर्यंत मारहाण केली. घाडगे यांच्यावर शारीरिक हल्ला केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

पक्षाचा सूर बदलला : एका महिन्यातच वरचढ पद
ही मारहाणीची घटना २० जुलै २०२५ रोजी घडली आणि दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाण यांचा राजीनामा घेतला. मात्र, अवघ्या महिन्याच्या आतच चव्हाण यांना वरचढ पद देत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलं आहे. कायद्याला हातात घेणाऱ्यांवर कोणतीही हयगय केली जाणार नाही, असा संदेश देणाऱ्या अजित पवार यांच्याच पक्षाने लगेच काही दिवसांत सूरज चव्हाण यांना आपल्या पक्षात स्थान दिलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संपूर्ण घटना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या मारहाणीशी संबंधित असूनही, पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रोत्साहन देत पुन्हा एक जबाबदारी दिली आहे. छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून ही नेमणूक झाल्याची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी उमटत आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी आणि कार्यकर्त्यांच्या भावना पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

