(कोल्हापूर )
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सैन्य भरतीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना झाली. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये पारस आनंदा परीट (21) आणि सुरेश ज्ञानदेव उंड्रीकर (21) या अंबर्डे (ता. शाहूवाडी) येथील तरुणांचा समावेश आहे. रविवारी होणाऱ्या मुख्य परीक्षेनंतर सायंकाळी देश सेवेसाठी सैन्यात भरती होण्याची स्वप्न घेऊन ते मोटारसायकलवरून घरी परतत होते. मात्र सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खुटाळवाडी-भाडळे खिंडीत घडला त्यांच्यावर काळाने घाला घातला.
अपघातावेळी उसाचा ट्रक महामार्गावरून जात होता. अचानक ट्रकने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा तत्काळ मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल कोगेकर, चालक माळी, तसेच महामार्ग पोलिसांचे उपनिरीक्षक आप्पासाहेब पालखी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या दोन होतकरू तरुणांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ट्रकचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

