(मुंबई)
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आलेल्या या संदेशात 400 किलो RDX 34 वाहनांमध्ये लावून स्फोट घडवून आणण्याची आणि तब्बल एक कोटी लोकांचा बळी घेण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी तत्परता दाखवत या धमकीचा माग काढला आणि आरोपीला नोएडा येथून अटक करण्यात आली.
आरोपीने स्वतःला पाकिस्तानी जिहादी संघटना ‘लष्कर-ए-जिहादी’चा सदस्य असल्याचा दावा केला होता. 14 दहशतवादी मुंबईत घुसले असून, 34 वाहनांमध्ये ‘मानवी बॉम्ब’ ठेवले आहेत असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला होता. स्फोटकांमुळे मुंबई हादरून जाईल आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल असा त्या मजकूर होता.
अटक आणि तपास
आरोपी अश्विनी कुमार (वय 50, मूळ पाटणा, बिहार) याला नोएड्यातील सेक्टर-79 मधून पकडण्यात आले. तो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय करतो. सध्या पत्नीपासून वेगळा राहतो अशी माहिती आहे. धमकीसाठी त्याने वापरलेला मोबाईल आणि सिमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. ज्या व्यक्तीच्या नावावरून सिमकार्ड वापरण्यात आले त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
धमकीचा मेसेज मिळताच गौतम बुद्ध नगर पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी तात्काळ संबंधित पथकांना कारवाईचे आदेश दिले. SWAT टीमने आरोपीला अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी धाडसी कामगिरीबद्दल SWAT टीमला ₹25 हजारांचे बक्षीस जाहीर केले.
अश्विनी कुमारला दिल्लीहून मुंबईत आणून पुढील चौकशी सुरू आहे. धमकीत उल्लेखलेले दहशतवादी, वाहनं आणि RDX याबाबत सखोल तपास सुरू आहे.

