(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी घडलेल्या घटनेनं उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले. संगमेश्वर एसटी स्टॅण्डपासून अवघ्या काही मीटर अंतरावर वाहनाच्या धडकेत एका गाईच्या वासराचा मृत्यू झाला. काही महिन्यांचा असलेला तो बछडा जागीच कोसळून प्राण सोडून गेला.
मात्र यानंतरचे दृश्य अधिकच हृदयद्रावक ठरले. मृत वासराच्या आईनं त्याच्या भोवती फेर धरला, त्याला चाटलं, हालचाल न झाल्याने हंबरडा फोडला. कळपातील इतर जनावरंही पुढे सरकली नाहीत, तर मृत वासराच्या शेजारीच ठाण मांडून बसली. हे भावनिक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले.
महामार्गावरील मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर
संगमेश्वर शहरात आणि महामार्गावर मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. पादचाऱ्यांसह वाहनधारकांनाही या जनावरांमुळे धोका निर्माण होतो. विशेषत: रात्रीच्या वेळी अंधारात अचानक गाय वा वासरू समोर आल्याने अपघात घडतात. यामध्ये मुक्या जनावरांचा नाहक बळी जातो.
काही दिवसांपूर्वीही शहरातील रस्त्यावर चारचाकीच्या धडकेत एका वासराचा मृत्यू झाला होता. तर महामार्गावरील अपघातात एक बैल ठार झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती सुरू असून, आता जनावरांच्या जीवित-मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पशूप्रेमींचा पुढाकार
संगमेश्वरातील काही सुजाण नागरिक आणि पशूप्रेमी जखमी जनावरांना उपचार, चारा-पाण्याची व्यवस्था करतात. मृत जनावरांचे दफन करण्याची जबाबदारीही घेतात. मात्र, अपघातांमध्ये मनुष्यहानी वा वित्तहानी झाल्यास समाज संघटित होतो; परंतु मुक्या जीवांसाठी क्वचितच कोणी पुढे सरसावतो.
मुक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठीही नागरिकांनी संघटित होऊन ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याची भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.

