(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२५-२६ साठीचे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले. यामध्ये खेड तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, सवेणी नं.१ येथील विद्यार्थीप्रिय आणि समर्पित शिक्षक श्री. एकनाथ आनंदराव पाटील यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली आहे.
शिक्षक म्हणजे समाजाला योग्य दिशा देणारा सर्वात जबाबदार घटक. डॉक्टराची चूक एका जीवाला धोका देऊ शकते, पण शिक्षकाची चूक संपूर्ण पिढीला प्रभावित करते. या जबाबदारीचे भान ठेवून विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर आपल्या तन्मय कार्याने अधिराज्य गाजवणारे पाटील सर या सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
आपल्या शिक्षण प्रवासात त्यांनी केवळ अभ्यासक्रमच शिकवला नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. अतिरिक्त तास घेणे, सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणे, पालक-शिक्षक भेटी, समाजसंपर्क यामध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या निष्ठा आणि समर्पणामुळे असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले.
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर “हा पुरस्कार मी माझ्या विद्यार्थ्यांना समर्पित करतो” हे त्यांचे शब्द त्यांच्या विद्यार्थ्यांवरील अपार प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञतेचे द्योतक आहेत.
पाटील सरांच्या कार्यातील वैशिष्ट्ये म्हणजे—
- विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करण्याची हातोटी
- शिष्यवृत्ती, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन, इस्रो-नासा प्रकल्पांपर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग
- रंगपंचमी, दहीहंडी, आषाढी वारी, योग शिबिरे, राष्ट्रीय दिनी परेड अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना संस्कार आणि संस्कृतीची जोड
- ‘व्हॉट्सॲप पंचांग’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सतत शैक्षणिक जोड
- बदली विषयाचा सखोल अभ्यास करून योग्य मार्गदर्शन
- रक्तदान, मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी, संघटनात्मक कार्य या माध्यमातून सामाजिक योगदान
- काव्यलेखन, शब्दसंपदा, समयसूचकता आणि सतत नवे शिकण्याची जिद्द
या सर्व गुणांचा परिपाक म्हणजे त्यांना मिळालेला ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’. हा सन्मान फक्त त्यांच्या शाळेसाठी नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाचा आहे.

