(ठाणे)
वागळे इस्टेट परिसरात जमिनीच्या जुन्या वादातून दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. याच वादाच्या रागातून संतोष पवार यांनी गाडी मुद्दाम उडवून विठ्ठल गायकर या शिवसेना कार्यकर्त्याचा निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री रोड नं. २७, हॅप्पी मॅन पुतळ्याजवळ घडली. या घटनेत तक्रारदार शंकर वरठे हे देखील गंभीर जखमी झाले असून, आरोपींविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींपैकी एकाला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
घटनेचा तपशील
२ सप्टेंबर रोजी रात्री तक्रारदार शंकर वरठे, त्यांचे मामा भाऊ बाबू बरफ, मित्र वसंत टोकरे आणि विठ्ठल गायकर हे चौघेजण वागळे इस्टेटमधील हॅप्पी मॅन पुतळ्याजवळ चहा पिण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी आरोपी संतोष पवार, महेश पवार, अमित पवार आणि महेश पाटील हे तेथे आले.
जमिनीच्या जुन्या वादातून त्यांनी वसंत आणि बाबूंशी वाद घालत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. या हत्येमागे संपत्तीचा वाद असल्याचे सांगितले जात असून, मृत व्यक्ती आणि आरोपी यांच्यात यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, संतोष पवारने गाडीतून उतरून रागाच्या भरात गाडी चालवली आणि थेट विठ्ठल गायकर यांना जोरात धडक दिली. त्यानंतर त्यांच्यावर दोन ते तीन वेळा गाडी घालून त्यांचा खून केला. संतोष पवारवर याआधीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शंकर वरठे यांनी विठ्ठल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरही गाडी घालून जखमी करण्यात आले. यानंतर आरोपी गाडी घेऊन फरार झाले. पळताना त्यांनी एक रिक्षाही धडकवली. गंभीर जखमी विठ्ठल यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलीस ठाण्यात आरोपी चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१), १०९(१), ११५(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

