(मुंबई)
ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. जे. पी. नाईक यांच्या कार्याची दखल केवळ भारतानेच नव्हे तर यूनेस्कोने देखील घेतली आहे. त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ याला नवे नाव दिले आहे. यापुढे हा पुरस्कार ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ या नावाने ओळखला जाईल, असा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दरवर्षी ५ सप्टेंबर – शिक्षक दिनी – विद्यापीठे, पारंपारिक व अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने, चित्रकला व उपयोजित कला महाविद्यालयातील प्राचार्य / शिक्षकांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षीपासून या पुरस्काराचे नाव ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ असे करण्यात आले आहे. लवकरच पात्र शिक्षकांकडून प्रस्ताव मागवून येत्या जानेवारीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
पात्रतेच्या अटी :
-
शासनाने विहित केलेल्या सेवाप्रवेश नियमानुसार नियुक्त व किमान १५ वर्षांची अध्यापन सेवा केलेले शिक्षक पात्र.
-
नियमित वर्ग अध्यापन करणारेच शिक्षक पात्र; प्रतिनियुक्तीवरील शिक्षक अपात्र.
-
सेवानिवृत्त शिक्षक व यापूर्वीच हा पुरस्कार मिळवलेले शिक्षक अपात्र.
-
विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळलेले किंवा चौकशी प्रलंबित असलेले शिक्षक पात्र राहणार नाहीत.
-
शिक्षकाविरुद्ध फौजदारी कारवाई किंवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसावा.
-
खाजगी शिकवणी न करणारेच शिक्षक पात्र.
-
प्राचार्यांसाठी अर्ज करतेवेळी किमान ३ वर्षांची प्राचार्य पदावरील सेवा पूर्ण असणे आवश्यक.
या अटींचे पालन न झाल्यास पुरस्कार तसेच त्याअनुषंगिक सोयी परत घेण्याची तरतूद शासनाने केली आहे. डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावाने पुरस्काराला नवी ओळख मिळाल्यामुळे, शिक्षकांच्या कार्याचा गौरव अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे.

