(मुंबई)
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक हिंदी, मराठी तसेच दक्षिण चित्रपटांत काम केलेले लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. ते काही काळापासून आजारी असल्याचे समजते. वयाच्या अवघ्या 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आशिष वारंग यांनी रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात शेवटची भूमिका केली होती. त्याशिवाय अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’, अजय देवगणच्या ‘दृश्यम’, राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ तसेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी छोटी पण लक्षवेधी कामगिरी केली होती. त्यांच्या भूमिका आकाराने लहान असल्या तरी, अभिनयातील तीव्रता आणि वास्तवदर्शी सादरीकरणामुळे त्या प्रेक्षकांच्या मनावर ठसल्या.
आशिष यांनी अमिताभ बच्चन, आमिर खान, राणी मुखर्जी, अजय देवगण, अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग, आशुतोष राणा, रोहित शेट्टी, जॉन अब्राहम अशा अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले आहे. या सर्वांसोबतचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विविध प्रोजेक्टमध्ये त्यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती. आशिष मराठी-हिंदीतील विविध जाहिरातींमध्येही झळकले होते. आशिष यांच्या निधनानंतर अवघ्या सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जाते आहे.
त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. सहकलाकार, मित्रमंडळी आणि चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आशिष वारंग यांनी सहाय्यक भूमिका करूनही सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पडद्यावर आणलेली त्यांची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहील.

