(परभणी)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण असताना, जिंतूर तालुक्यातील सोनपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून पतीनेच पत्नीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघी गावचे विजय राठोड यांचा विवाह सोनपूर तांडा येथील विद्या विजय राठोड यांच्याशी झाला होता. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे विद्या ही माहेरी राहण्यासाठी आली होती. काल (२८ ऑगस्ट) ती आपल्या वडिलांच्या शेतात काम करत असताना, तो तिथे आला. तिथे पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला. वाद एवढा टोकाचा गेला की विजय राठोडने हातातील धारदार शस्त्राने पत्नीवर सपासप १० ते १२ वार केले. छाती, पोट आणि पाठीवर झालेल्या या गंभीर वारांमुळे विद्याला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पारवे यांनी तिला मृत घोषित केलं.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी आक्रोश केला. संतप्त जमावाने आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, खून करण्याआधीच विजय राठोड याने व्हॉट्सअॅपवर पत्नीचा फोटो आणि ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असलेलं स्टेटस ठेवले होते, हे तपासात उघड झालं आहे. त्यामुळे, हा खून पूर्वनियोजित होता का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विजय राठोडने आपल्या पत्नीचा इतक्या क्रूरपणे खून का केला? वादामागचं नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

