(नाशिक)
सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. चारचाकी कार अंदाजे 900 ते 1000 फूट खोल दरीत कोसळल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि एक वृद्ध महिला असा समावेश आहे. इनोव्हा कारमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते, त्यापैकी एकजण जीव वाचवू शकला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कसा झाला अपघात?
स्थानिकांच्या माहितीनुसार, कार (MH 15 BN 0555) वणी येथून देवीचं दर्शन घेऊन सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना गणपती पॉईंटजवळ हा अपघात झाला. यावेळी वाहन चालकाचा ताबा सुटला, गाडीने संरक्षण कठडा तोडला आणि कार थेट खोल दरीत कोसळली. दरी अत्यंत खोल असल्याने येणाऱ्या अडथळ्यांमुळे मदत कार्य सुरुवातीला मंद गतीने सुरू सुरु होते. स्थानिक नागरिकांनी, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी धोकादायक परिस्थितीत मदतकार्य केले.
सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्ताहांतात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. याच गर्दीत पिंपळगाव बसवंत येथील सात जण देवीचं दर्शन घेऊन परतत होते, तेव्हाच ही दुर्घटना घडली.
पटेल कुटुंबावर काळाचा घाला
या कार अपघातात पिंपळगाव बसवंत येथील प्रसिद्ध पटेल कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये किर्ती पटेल (50), विठ्ठल पटेल (65), लता पटेल (60), पचन पटेल (60), मनीबेन पटेल (70) रसीला पटेल (50) यांचा समावेश आहे. या अपघातामुळे पिंपळगाव बसवंत गावात शोककळा पसरली असून गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडिया ‘एक्स’ अकाऊंट वर शोक व्यक्त व्यक्त करत त्यात म्हण्टले आहे की, ‘नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे.या भाविकांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल.’

