(राजापूर /प्रतिनिधी)
नगर परिषदेच्या मतमोजणीदरम्यान विजयाच्या आनंदात केलेला उतावळा जल्लोष अखेर कार्यकर्त्यांसाठीच खंतजनक ठरल्याची घटना राजापुरात घडली. अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच एका उमेदवाराच्या विजयाची चर्चा पसरली आणि त्यावर विश्वास ठेवत काही कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.
मतमोजणी सुरू असतानाच संबंधित उमेदवार विजयी ठरल्याची माहिती पुढे येताच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काही कार्यकर्ते नाचू लागले, तर काहींनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. थोड्याच वेळात निवडणूक प्रशासनाकडून अधिकृत निकाल समोर आला आणि संबंधित उमेदवार पराभूत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे क्षणभरापूर्वी जल्लोषात दुमदुमणारा परिसर अचानक शांत झाला.
फटाके वाजवण्याच्या घाईगडबडीमुळे आणि अधिकृत घोषणेची वाट न पाहिल्याबद्दल जल्लोष करणाऱ्यांमध्येच नंतर पश्चात्तापाची भावना दिसून आली. अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वी पसरलेल्या अफवांमुळे झालेला हा प्रकार शहरात चर्चेचा विषय ठरला.

