(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा-पंधरामाड परिसरातील पाटील बोळ येथील रस्त्याच्या मोजणीसाठी शुक्रवारी शहर भूमापन कार्यालय आणि रत्नागिरी नगरपरिषदेचे संयुक्त पथक दाखल झाले होते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांच्या तीव्र हरकतीमुळे मोजणी न करताच पथकाला माघारी फिरावे लागले.
शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार विविध भागांतील रस्ते रुंदीकरण आणि नव्या रस्त्यांची आखणी सुरू असून, त्या अनुषंगाने पाटील बोळ येथील रस्त्याची मोजणी नियोजित होती. संबंधित भागातील रहिवाशांना मोजणीबाबत आधीच नोटीस पाठवून, त्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
शहर भूमापन अधिकारी गणेश गोवेकर आणि नगरपरिषदेचे आनंद थोरात यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मोजणीसाठी स्थळावर भेट दिली. मात्र, त्याचवेळी परिसरातील सुर्वे, मयेकर, पाटील, चेंदवणकर आदी कुटुंबातील नागरिकांनी मोजणीला तीव्र हरकत घेतली. रस्त्याच्या रुंदीकरणात आपली मालमत्ता जाण्याची भीती व्यक्त करत त्यांनी मोजणीला विरोध केला.
पथकाने नागरिकांच्या लेखी हरकती पंचासमक्ष स्वीकारल्या आणि तात्पुरती मोजणी स्थगित करत, पुढील स्थळी प्रयाण केले. यामुळे पाटील बोळातील रस्ता मोजणीची प्रक्रिया अनिश्चिततेत अडकली आहे. नगररचना योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने पुढील पावले कोणती उचलणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.