(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रत्नागिरी येथील शिक्षक प्रदीप शांताराम जाधव यांची यंदाच्या ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५’ साठी निवड झाली आहे. शब्दगंध समूह प्रकाशनतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जाधव यांनी सातत्याने केलेले शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेली मूल्याधिष्ठित शिकवण तसेच सामाजिक क्षेत्रात दिलेला मोलाचा हातभार या कार्याचे समाजभरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत शब्दगंध समूह प्रकाशनने त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अभिनंदनपत्रात म्हटले आहे की, आपण करीत असलेले शैक्षणिक आणि सामाजिक कार्य स्तुत्य असून, आपल्या योगदानामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. या कार्याची नोंद घेऊन ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्यात येत आहे. या सन्मानामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्राला नवे प्रेरणास्थान लाभले असून, प्रा. जाधव यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

