(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद कळझोंडी धरणातून गेल्या आठ दिवसांपासून गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जलशुद्धीकरण यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत अलीकडच्या काळात धरणाची उंची वाढविणे, जॅकेटींग आणि ग्राऊटींगची कामे कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आली. मात्र, नव्याने उभारण्यात आलेल्या पंप हाऊसमध्ये नैसर्गिक झरे न ठेवता तळापासून संपूर्ण आरसीसी बांधकाम करण्यात आल्याने धरणातील गढूळ पाणी थेट पंप हाऊसमध्ये जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पूर्वीच्या पंप हाऊसमध्ये नैसर्गिक झरे असल्याने मुसळधार पावसानंतरही काही तासांत पाणी स्वच्छ होत असे. मात्र सध्याच्या नव्या जॅकवेलमध्ये ही व्यवस्था नसल्याने गढूळ पाण्याचा थेट पुरवठा होत आहे. विशेष म्हणजे पंप हाऊस परिसरात फळ्या, खिळे, सळ्या, प्लायवूडचे तुकडे आणि इतर बांधकाम साहित्य पडून असल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून धरण, पाणी साठवण टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असले तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतरच जलशुद्धीकरण यंत्रणेची मर्यादा उघड झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. “आता पावसाळा अजून तीन महिने बाकी असताना ही अवस्था असेल, तर पुढे परिस्थिती किती गंभीर होईल?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
धरण आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी, तसेच तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी दक्ष नागरिकांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा तातडीने सुरू झाला नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कळझोंडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेतही ग्रामस्थ आणि महिलांनी गढूळ पाणीपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
जयगड, वाटद, खंडाळा आणि कळझोंडी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष आता प्रशासन नेमकी कोणती आणि किती तातडीची कारवाई करते याकडे लागले आहे.

