(गणपतीपुळे / वैभव पवार)
मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने नेवरे येथील आरोग्य उपकेंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये १९७ नागरिकांची विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
शिबिराचे उद्घाटन जनआरोग्य समिती मालगुंडचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश उर्फ राजू साळवी, पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी, जनआरोग्य समितीचे सचिव व वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके तसेच प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर शिंदाडकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना जि.प. सदस्य राजेश साळवी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
शिबिरात ईसीजी, नेत्र तपासणी, सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, रक्त तपासणी, क्षयरोग निदानासाठी थुंकी तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखर तपासणी, वजन व उंची मोजणी, आयुष्मान भारत (आभा) कार्ड नोंदणी, शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण तसेच बाल लसीकरण अशा विविध आरोग्य सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिरास माजी सरपंच तथा प्रशासक दीपक फणसे, माजी सरपंच अनंत शिंदे, सदस्य कुंती पवार, ऋतुजा गुरव, सागर मायंगडे, पोलीस पाटील स्नेहा पेडणेकर, ग्रामसेवक प्रणिता सावंत, अंगणवाडी पर्यवेक्षिका भागवत, जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रीती फुके, समता फाउंडेशनचे नितेश शेट्ये, सरपंच मदा मोरे, पत्रकार वैभव पवार व सचिन दुर्गवळी, आरोग्य निरीक्षक, सीएचओ, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, लॅब टेक्निशियन श्रुतिका मोहित, गटप्रवर्तक सिद्धी आढाव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

