( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील सातव्या टप्प्यातील शिक्षक बदल्या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी जारी केलेल्या बदल्यांच्या आदेशानंतरही अनेक शिक्षकांनी नव्या शाळांवर हजेरी लावली नाही, तर काहींनी अचानक एकत्रित रजेचा आधार घेतला. या निर्णयामुळे तब्बल ८९ शिक्षकांची सेवा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
१७ ऑक्टोबर रोजी सीईओ यांच्या स्वाक्षरीने बदल्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. काही शिक्षकांनी तत्काळ नव्या शाळांवर रुजू होऊन जबाबदारी स्वीकारली, तर काहींनी १८ ऑक्टोबरला अर्जित रजेचा आधार घेत हजेरी टाळली. दरम्यान, दिवाळीची सुट्टी सुरू झाल्याने त्यांनी बदल्या रद्द होतील, या अपेक्षेने थांबण्याचा मार्ग निवडला. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीने स्थगिती आदेश जारी झाल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली.
प्रशासनातील विसंगतीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. सीईओ यांनी काढलेला आदेश वरिष्ठ पातळीवरील असताना, कनिष्ठ अधिकाऱ्याने तो स्थगित करण्याचा निर्णय कसा घेतला? हा प्रश्न शिक्षणवर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. स्थगिती आदेश हा कोणाच्या दबावाखाली काढण्यात आला, याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत. या गोंधळात काही शाळांमध्ये ‘मोकळे करा’ आणि ‘हजर करून घ्या’ अशा तोंडी आदेशांवरून वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे कार्यमुक्त करणारे आणि नव्या शाळेत हजर करून घेणारे दोन्ही मुख्याध्यापक भविष्यात कायदेशीर अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिक्षक बदल्यांचे आधीचे सहा टप्पे विनावाद पूर्ण झाले होते; मात्र या सातव्या टप्प्यात काही मोजक्या शिक्षकांच्या हितसंबंधासाठी संपूर्ण प्रक्रिया अडथळ्यात आली, अशी नाराजी शिक्षकवर्गात व्यक्त होत आहे. दुर्गम भागात दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना सोयीच्या शाळांमध्ये बदलीची संधी नाकारली जाणे, हे अन्यायकारक असल्याचे शिक्षणप्रेमींचे मत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानंतर शिक्षकांनी उपस्थिती टाळून ‘रडीचा डाव’ खेळल्याचा आरोप होत असून, नियमानुसार बदली आदेश न पाळणाऱ्या शिक्षकांवर सेवा खंडनाची कारवाई होऊ शकते. शिक्षक सेवेत दाखल होताना “कोणत्याही शाळेत कार्य करण्यास तयार” अशी अट मान्य करूनच प्रवेश घेतात, अशावेळी दुर्गम भागात जाणे टाळणे योग्य नाही, असा सवाल शिक्षणवर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

