(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील सुंदरवाडी परिसरात ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून वीज वाहिन्यांवरील धोकादायक झाडी हटवून एसटी बस वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. दिवसभर चाललेल्या या उपक्रमातून ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी, एकजूट आणि सार्वजनिक सुविधांप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित केली.
सुंदरवाडी परिसरातील वीज वाहिन्यांवर वाढलेल्या झाडांच्या फांद्या तसेच एसटी बसच्या येण्या-जाण्याच्या मार्गात अडथळा ठरणारी झाडी हटविण्यासाठी व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक ग्रामस्थांनी आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्रमदान केले.
या मोहिमेतील सर्वाधिक धोकादायक काम म्हणजे उंच झाडांवर चढून वीज वाहिन्यांजवळील फांद्या हटविण्याचे होते. रोहित मयेकर आणि जितेश नार्वेकर यांनी हे काम धाडसाने पार पाडले. तसेच वयाची पर्वा न करता शत्रुघ्न वाडेकर यांनीही झाडावर चढून श्रमदानात सहभाग घेत इतरांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
प्रीतम वाडेकर, अशोक आंबोळकर, देवेंद्र करंगुटकर, अनिल नार्वेकर आणि राजेंद्र मयेकर यांनी झाडी-झुडपे हटविण्याच्या कामात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसर अधिक सुरक्षित झाला आणि एसटी वाहतुकीतील अडथळे दूर झाले. या उपक्रमाला महावितरण विभागाचे कर्मचारी गजा लिंगायत, मराठे आणि अनिकेत चव्हाण यांनीही सहकार्य केले. मशीनच्या साहाय्याने त्यांनी धोकादायक फांद्या काढून वीज वाहिन्या सुरक्षित करण्याचे काम केले.
ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीकांत करंगुटकर (नाना) आणि विश्वासभाई करंगुटकर यांनी दिवसभर उपस्थित राहून श्रमदान मोहिमेला प्रोत्साहन दिले. तसेच विश्वासभाई करंगुटकर यांनी श्रमदान करणाऱ्या सर्वांसाठी स्वतःच्या खर्चातून चहा-नाश्त्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. विशेष म्हणजे अनेक ग्रामस्थांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत घरी जेवायलाही न जाता अखंड श्रमदान करत गावाच्या सुरक्षिततेसाठी योगदान दिले. सार्वजनिक सुविधांचे संरक्षण आणि गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट व समर्पणभावना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
“आपले गाव, आपली जबाबदारी” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या श्रमदान मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत असून, उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थ आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

